भांडण सोडविण्यास आलेल्या तरुणाचा खून; एकास जन्मठेप ! आरोपीच्या लहान भावासही ७ वर्षांचा सश्रम कारावास

 भांडण सोडविण्यास आलेल्या तरुणाचा खून; एकास जन्मठेप !

आरोपीच्या लहान भावासही ७ वर्षांचा सश्रम कारावास


लातूर: आपल्या मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा चाकुने भोसकून खून केल्याची घटना अडीच वर्षांपूर्वी शहरातील विक्रमनगर भागात घडली होती. या प्रकरणी लातूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी (दि.१७) दोन सख्ख्या भावांपैकी एकास जन्मठेप तर एकास ७ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, शहरातील प्रकाश नगर भागात शिवाजी शाहू कापसे हे आपला एक मुलगा, एक मुलगी आणि पत्नीसह वास्तव्यास आहेत. दि. २५ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री शिवाजी कापसे हे आपल्या कुटुंबासोबत रात्रीचे १० वाजता जेवन घेतल्यानंतर त्यांचा मुलगा अशोक शिवाजी कापसे हा त्याचा मित्र मोहित बावणे याच्या घरी अभ्यासासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला. अशोक कापसे आणि त्याचा मित्र मोहित बावणे हे दोघे एकत्र असताना रात्री ११ वाजता विक्रम नगर येथील अजय पिसाळ या तरुणाचा मोहित बावणे याला फोन आला. या दोघांमध्ये शिवीगाळ झाली. यानंतर भरात मोहितने अशोकला सोबत घेऊन विक्रम नगर गाठले. यावेळी अजय पिसाळ आणि मोहित यांच्यात बाचाबाची आणि धक्काबुक्की सुरू झाली. हा वाद सोडविण्यासाठी अशोक कापसे हा मध्ये पडला. त्यामुळे अजयने आपला लहान भाऊ विजय पिसाळ याला आवाज देऊन बोलावले. यावेळी विजय घराबाहेर आला, तेच हातात मोठा सुरा घेऊन. येताक्षणी त्याने कोणताही विचार न करता हातातील सुऱ्याने भांडण सोडविण्यास आलेल्या अशोक कापसे याच्या गळ्यावर, छातीवर, मांडीवर गंभीर वार केले. यात अशोक जागीच ठार झाला. तर त्याच्या सोबत असलेल्या मोहित याच्या मांड्यावर, पाठीत सुऱ्याने भोसकले. गंभीर अवस्थेत मोहितला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तो वाचला. घटनेनंतर या संदर्भात अशोकचे वडील शिवाजी शाहू कापसे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसांत गुरनं ४४९/२३ कलम ३०२, ३०७, ३४ भादंवि अन्वये अजय पिसाळ व विजय पिसाळ या दोघा भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कल्याण नेहरकर यांनी करुन लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात

दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. ४ डी. बी. माने यांच्या समोर चालले. सदर प्रकरणात एकूण ११ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. ज्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. घटना स्थळावरील सीसीटीव्ही फुटेज साक्ष पुराव्याच्या वेळेस सादर करण्यात आले. दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर न्या. डी. बी. माने यांनी आरोपी विजय दिनकर पिसाळ (वय २५) यास भा. द. वि. कलम ३०२ खाली दोषी ठरवत, आजन्म कारावास तसेच भा.द.वि. कलम ३०७ प्रमाणे ७ वर्षे प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दुसरा आरोपी अजय दिनकर पिसाळ (वय २७) यास भा.दं.वि. कलम ३०७ नुसार ७ वर्षे शिक्षा व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील संतोष वसंतराव देशपांडे यांनी काम पाहिले. तसेच समन्वयक व पैरवी अधिकारी पोलीस हवालदार आर. टी. राठोड, पो. हे. ज्योतीराम माने व अॅड. प्रियांका देशपांडे, दिलीप नागराळे यांनी त्यांना सहकार्य केले.

Comments